Vijayapura

‘एनटीए’ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय बसवसेनेचे भव्य आंदोलन!

Share

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करण्यात यावी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय बसवसेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे भव्य आंदोलन करण्यात आले.

शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकापासून बसवेश्वर चौकापर्यंत शेकडो विद्यार्थी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

या वेळी राष्ट्रीय बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरगौडा बिरादार म्हणाले, “पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. परीक्षा व्यवस्थेवर विश्वास आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यात एनटीए आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”

दिल्लीत शैक्षणिक न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. एनटीए रद्द करून नवी पारदर्शक परीक्षा पद्धत लागू करावी, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनानंतर विद्यार्थी कु. रेणुका हट्टी हिने निवेदनाचे वाचन करून शिरस्तेदार राजू हादिमनी यांना निवेदन सादर केले.

या वेळी एपीएमसीचे माजी अध्यक्ष शेखर गोळसंगी, वकील रवी राठोड, चंद्रशेखरगौडा पाटील, प्रशांत मुंजाने, जट्टिंगराय मालगार, भद्रण्णा मण्णूर, प्रवीण पुजारी, आनंद वनरोट्टी, संगमेश जालगेरी, द्यावनगौडा पाटील, बसवराज लामाणी, रेणुका हट्टी, सानिया नदाफ, संजना पाटील, ऐश्वर्या बडीगेर, लक्ष्मी जालगेरी यांच्यासह शेकडो विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Tags: