Uncategorized

पांगुळ गल्लीत पावसाचे पावसाच्या पाण्यामुळे मुख्य बाजारपेठेची दाणादाण

Share

बेळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीत पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने , तसेच विविध विकासकामांच्या नावाखाली ठिकठिकाणी केलेल्या खोदाईमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला असून, महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण परिसराची दाणादाण उडाली आहे.

शहरातील मुख्य व्यापारी केंद्र आणि गर्दीचे ठिकाण असलेल्या पांगुळ गल्लीसह गणपत गल्ली परिसरात पावसामुळे पाणी थेट दुकानांमध्ये आणि व्यापारी आस्थापनांमध्ये शिरले आहे. यामुळे मालाचे मोठे नुकसान झाले असून, रस्त्यावरील विक्रेत्यांची व फेरीवाल्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाचे पाणी आणि गटारांचे तुंबलेले पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ असूनही येथील कायमस्वरूपी समस्येकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मनपाच्या विकासकामांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले आहे.

आरपीडी सर्कल भागातही प्रत्येक पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर येण्याची तीच समस्या पुन्हा डोके वर काढत आहे. लोकप्रतिनिधींकडून प्रत्येक वेळी केवळ आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्ष पातळीवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याने परिस्थिती पूर्ववत राहून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

भविष्यात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येईल, हे मात्र खरे आहे.

Tags: