‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने मंगळवारी पंतप्रधान निवासासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सहभाग नोंदवून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळाला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. मात्र, या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या कारवाईचा निषेध करत पंतप्रधान निवासाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तुकडीत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सहभागी झाले होते.

देशातील परीक्षा पद्धत आणि शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून परीक्षा यंत्रणा पोकळ झाली असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली पोलीस मारहाण अत्यंत चुकीची असून, या कारवाईला गृह मंत्रालय जबाबदार आहे; त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रियंका गांधी आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


Recent Comments