Uncategorized

डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; लक्ष्मण सवदी व अशोक पट्टण शर्यतीत

Share

डी. के. शिवकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी काँग्रेस आमदारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असून इच्छुकांची यादी दिवसेंदिवस लांबत चालली आहे. मुख्यत्वे लिंगायत समुदायाच्या कोट्यातून वरिष्ठ नेते लक्ष्मण सवदी आणि अशोक पट्टण हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

लिंगायत समाजातून मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत लक्ष्मण सवदी आणि अशोक पट्टण आघाडीवर असून त्यांच्यासोबत विजयानंद काशप्पनवर, बसवराज रायरेड्डी, हम्पनगौडा बादर्ली, यशवंतरायगौडा आणि अप्पाजी नाडगौडा यांचीही नावे चर्चेत आहेत. यापैकी तिघांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुस्लिम नेत्यांमध्ये रिझवान अर्शद, जमीर अहमद खान, तन्वीर शेठ, सलीम अहमद आणि कनीज फातिमा यांची नावे आघाडीवर असून तिघांना स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, वोक्कलिगा कोट्यातून शरद बच्चेगौडा, मागडी बालकृष्ण, गुब्बी वासू, शिवलिंगेगौडा, चेलुवरायस्वामी आणि प्रियाकृष्णा शर्यतीत असून तिघांना संधी मिळू शकते. महिला कोट्यातून आरती कृष्णा, लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि नयना मटम्मा यांच्यात स्पर्धा असून दोघांची वर्णी लागू शकते. तसेच ओबीसी वर्गातून अजय सिंग, श्रीनिवास माणे, संतोष लाड आणि मंकाळू वैद्य यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर पडदा पडून अधिकृत अंतिम यादी जाहीर होणार आहे.

Tags: