बनावट कागदपत्रे आणि खोटा कुलमुखत्यारनामा तयार करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना बेळगावच्या मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

उपनिबंधक कार्यालयात खोटी स्वाक्षरी आणि बनावट फोटोचा वापर करून दुसऱ्याच व्यक्तीला उभे करत मालमत्ता हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कडोली येथील परशुराम दुडुम यांच्या तक्रारीवरून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी दस्तऐवजावरील फोटोच्या आधारे शोध घेऊन मुख्य संशयित इसाक इस्माईल मुजावर आणि नागराज रामचंद्र कडकोळ या दोघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

अटक करण्यात आलेल्या नागराज कडकोळ याच्यावर यापूर्वीही अंकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो जामिनावर बाहेर होता. मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिरची आणि पीएसआय एच. एल. केरूळ यांच्या पथकाने ही कारवाई केली असून बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.


Recent Comments