Uncategorized

कागवाडमध्ये वृत्तपत्र दिन उत्साहात साजरा

Share

प्रसारमाध्यमांमध्ये समाजातील त्रुटी आणि दोष दूर करण्याची मोठी ताकद असून, पत्रकारांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत जबाबदारीने कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केले.

कागवाड येथील आचार्य विद्यासागर शिक्षण संस्थेत तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वृत्तपत्र दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कुडची-उगार, जुगुळ-खिदरापूर आणि मुळवाड-चिंचली दरम्यान कृष्णा नदीवरील पुलांची कामे आठ वर्षांनंतरही अपूर्ण असून, श्री बसवेश्वर उपसा सिंचन योजनेचे कामही प्रलंबित आहे. अशा सार्वजनिक हिताच्या विषयांकडे प्रसारमाध्यमांनी प्रशासनाचे लक्ष वेधले पाहिजे, असे मत आमदार राजू कागे यांनी व्यक्त केले.

पुढील वर्षापासून कागवाड आणि अथणी तालुक्यातील पत्रकारांनी संयुक्तपणे वृत्तपत्र दिन साजरा करावा, त्याचा सर्व खर्च आपण करू, अशी घोषणा अथणीचे काँग्रेस युवा नेते चिदानंद सवदी यांनी केली. तसेच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आमदार राजू कागे यांच्यात कोणतेही मतभेद नसून दोघेही समन्वयाने विकासकामे करत असल्याचे चिदानंद सवदी यांनी स्पष्ट केले.

पत्रकार समाजातील समस्या प्रकाशात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. सर्व पत्रकारांनी एकजुटीने समाजसेवा करतानाच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असा आशीर्वाद परमानंदवाडी ब्रह्मानंद मठाचे अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी यांनी दिला.

या कार्यक्रमास कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादिमनी, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष कुमार गाणिगेर, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरण्णा माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बसगौडा कागे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम.एस. मगदूम, सिंचन विभाग अधिकारी रवींद्र मुरुगाले, गट शिक्षण अधिकारी चेन्निगरामय्या आणि सीडीपीओ रवींद्र गुद्गेनवर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Tags: