Belagavi

मलप्रभा नदीत पाणी सोडण्याची बागलकोटमधील शेतकऱ्यांची मागणी

Share

बागलकोट आणि बदामी भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर ब्ल्याच्या पार्श्वभूमीवर नविलूतीर्थ जलाशयातून तातडीने १ टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बदामी तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

यावर्षी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस अत्यंत कमी झाला असून जलाशयांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा झालेला नाही. सध्या नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे पहिले प्राधान्य आहे. जलाशये आणि नद्यांचे संपूर्ण नियंत्रण प्रादेशिक आयुक्तांकडे असल्याने, उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तेच यावर योग्य निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण स्वतः प्रादेशिक आयुक्तांकडे याबाबत शिफारस करणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी याविषयीचा प्रस्ताव तातडीने प्रादेशिक आयुक्तांकडे पाठवणार आहेत. नविलूतीर्थ जलाशयातून शक्य तितके पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची पिके आणि जनावरांसाठी पाण्याची तातडीची गरज लक्षात घेता, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केल्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

Tags: