Belagavi

उद्योगांसाठी विजेचे योग्य व्यवस्थापन आवश्यक: खासदार जगदीश शेट्टर

Share

उद्योगांच्या प्रगतीसाठी अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा अत्यंत आवश्यक असून, तांत्रिक बिघाड व प्रशासकीय कारणांमुळे उद्योजकांना होणारा त्रास तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश माजी मुख्यमंत्री तथा बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत.

बैठकीत हेस्कॉमच्या अभियंत्यांनी वीज पुरवठ्यात वारंवार खंड पडण्यामागील तांत्रिक कारणांचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होणे, वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडणे आणि वन विभागाच्या परवानग्या मिळण्यास होणारा विलंब यामुळे दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करता येत नाहीत, असे अभियंत्यांनी सांगितले. याशिवाय, काही उपकेंद्रांचेअपग्रेडेशन प्रलंबित असल्याने आणि अंतर्गत तांत्रिक बिघाडांमुळे तात्पुरता वीज पुरवठा खंडित करावा लागत असल्याचा मुद्दाही अभियंत्यांनी बैठकीत मांडला

अभियंत्यांनी मांडलेल्या कारणांवर आक्षेप घेत, तांत्रिक बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्यासाठी कमीत कमी वेळ लागला पाहिजे आणि वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित असायला हवी, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी अभियंत्यांना सुनावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औद्योगिकीकरण व आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेनुसार, कर्नाटक आता वीज निर्मितीत स्वयंपूर्ण झाला आहे; परंतु या विजेचे योग्य व्यवस्थापन करून उद्योगांना अखंडित पुरवठा करणे गरजेचे आहे. बेंगळुरूनंतर बेळगावातील उद्योजक सर्वाधिक कर, जीएसटी आणि हेस्कॉमला सर्वाधिक वीज बिल भरतात; त्यामुळे त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरच तात्काळ निवारण करायला हवे होते, जेणेकरून हा विषय लोकप्रतिनिधींपर्यंत आला नसता, अशा शब्दांत खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

उद्योजकांच्या सब-स्टेशन अपग्रेडेशन, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, तसेच प्रलंबित वन विभाग मंजुरी व जमीन अधिग्रहणाच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्याप्रमाणे विमानतळाच्या ६० एकर जमीन अधिग्रहणाचा ६ महिने रखडलेला प्रश्न जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकाच बैठकीत मार्गी लावला, त्याच धर्तीवर हेस्कॉमने दरमहा उद्योजकांसोबत समन्वय बैठक घ्यावी. ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री उत्तरे न देता, येत्या २ ते ३ महिन्यांत जमिनीवर ठोस सुधारणा करून दाखवावी, अशी कडक तंबीही खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.

Tags: