Chikkodi

कोटबागी उपसा सिंचनमधून पाण्याचा तुटवडा:किसान संघाचे तहसीलदारांना निवेदन

Share

तालुक्यातील कोटबागी उपसा सिंचन कालव्याच्या शेवटच्या चार गावांना पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या चिकोडी शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या ३-४ वर्षांपासून सातत्याने आंदोलन करूनही संबंधित अधिकारी शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून अद्याप त्याची साधी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी विचारणा केल्यास, मोटर नादुरुस्त आहे किंवा जॅकवेलमध्ये पाणी नाही, अशी बेजबाबदार उत्तरे देऊन अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

सध्या कालव्याच्या केवळ १ ते ६ क्रमांकाच्या गेटपर्यंतच पाणी वाहत असून, ७ आणि ८ क्रमांकाच्या गेट असलेल्या शेवटच्या भागात पाणी पोहोचत नाही. पाऊस नसल्यामुळे सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जवळच हिरण्यकेशी नदी भरून वाहत असताना, डोळ्यांसमोर पाणी असूनही शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आगामी २-३ दिवसांत शेवटच्या गावांपर्यंत पाणी न पोहचल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किसान संघाचे अध्यक्ष राजप्पा शिवप्पा शिवापुरे यांनी दिला आहे.

या प्रसंगी भारतीय किसान संघाचे पदाधिकारी, शेतकरी नेते दुंडप्पा बेंडवाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: