Chikkodi

खासदार प्रियांका जारकीहोळी यांना शेतकऱ्यांचे विविध मागण्यांचे निवेदन

Share

चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन खासदार प्रियांका जारकीहोळी यांना देण्यात आले. यावेळी स्थानिक भागातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

नागरमुन्नोळी गावातील शेतामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली. तसेच हुक्केरी तालुक्यातील सुलतानपूरजवळ वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीतून उपकालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. कोटबाग उपसा सिंचन योजनेतून करगाव, डोणवाडा, बेळकुड आणि नागरमुन्नोळी गावातील तलाव तसेच शेतीला पाणी देऊन या भागातील टंचाई दूर करावी, असे निवेदनात नमूद आहे.

या भागातील शेतकरी आणि शाळकरी मुलांच्या समस्या गंभीर असून खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती रयत संघाचे तालुकाध्यक्ष मनोज मनगुळी यांनी केली. निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी शेतकरी नेते बसवराज मनगुळी, मल्लप्पा नागराळे, सत्यगौडा बसगौडनमनवर, शंकर पडेद, रवी कुंभूजे, इमाम मुलतानी, विठ्ठल कोकनूर, राघू सावकार यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: