Chikkodi

अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून चिकोडीत भाजप आक्रमक

Share

देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांना बाहेर काढणे गरजेचे असताना, कर्नाटक सरकार त्यांना शाश्वत रहिवासी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना काढत आहे. हा निर्णय अत्यंत निषेधार्ह आहे, असा संताप भाजप जिल्हा सरचिटणीस अमृत कुलकर्णी यांनी चिकोडीत व्यक्त केला.

चिकोडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाच्या संविधानानुसार नागरिकत्व देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. मात्र, राज्यातील काँग्रेस सरकार संविधानाचे उल्लंघन करून काम करत आहे. या जनविरोधी धोरणाचा चिकोडी जिल्हा भाजप तीव्र विरोध करेल आणि याविषयी केंद्र सरकारला निवेदन सादर करेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

या वेळी भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य महेश भाते यांनीही कडक शब्दांत इशारा दिला. विदेशी अवैध स्थलांतरितांविरोधातील आमचा लढा सुरूच राहील आणि कोणत्याही परिस्थितीत ही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला रमेश काळण्णावर, शिवानंद नवलीहाळे, राजू हरगन्नावर, शकुंतला डोनवाडे, संजीव पाटील, पवन महाजन यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: