प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आणि सरकारी योजनांचे लाभ मिळावेत यासाठी ‘एसआयआर’ नोंदणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील काकती गावातील सरकारी हायस्कूलच्या निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


शाळेच्या नोडल अधिकारी सुमित्रा करविनकोप्प यांच्या नेतृत्वाखाली साक्षरता क्लबच्या विद्यार्थ्यांनी काकती गावातील प्रमुख रस्ते, गर्दीची ठिकाणे आणि बाजारपेठेत विशेष घोषणा देत रॅली काढली. या वेळी विद्यार्थ्यांनी भाजी विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांची भेट घेऊन एसआयआर-२०२६ चे महत्त्व पटवून दिले. कोणत्याही नागरिकाने या प्रक्रियेपासून वंचित न राहता तातडीने नाव नोंदणी करावी आणि आपल्या मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, असे आवाहन शिक्षिका सुमित्रा यांनी केले.

शाळकरी मुलांच्या या सामाजिक उपक्रमाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेकांनी आपली नोंदणी पूर्ण केल्याचे सांगत, इतर नागरिकांमध्येही याबाबत जागृती निर्माण करण्याचे आश्वासन दिले. या मोहिमेत मुख्याध्यापक अशोक खोत, शिक्षक गिरीश जगजंपी, ललिता महाजन शेट्टी, गीता कानट्टी, महेश अक्की, शिवानंद तल्लूर यांच्यासह आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments