Belagavi

शासकीय यंत्रणेने लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे : मुख्यमंत्री

Share

बेळगाव येथील सुवर्ण विधानसभा संकुलात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय विभागीय आढावा बैठक पार पडली. “शासकीय यंत्रणेने लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असून प्रशासनाने नागरिकांना कार्यालयात हेलपाटे घालण्यास लावू नये,” असे निर्देश त्यांनी दिले. जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मंत्र्यांसह ‘प्रजासेवा विभाग’ सुरू करण्यात येणार असून, सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक केले आहे. तसेच, जिल्हा पालकमंत्री दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तालुक्यांमध्ये जनसंपर्क सभा घेणार आहेत.

ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी ८,००0 कोटी रुपये खर्चून २००० अत्याधुनिक शासकीय शाळा उभारण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवाय, प्रत्येक पंचायतीत ‘भारत जोडो युवक संघ’ स्थापन करून १० लाख रुपयांचा निधी आणि गरिबांना भूखंड दिले जातील. बैठकीत उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हमी योजनांमुळे विकास खुंटला नसल्याचे स्पष्ट करत, टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी सुवर्णसौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून अधिकृत कामकाजाला सुरुवात केली.

या बैठकीला मंत्री सतीश जारकीहोळी, एम.बी. पाटील, यु.टी. खादर, ईश्वर खंड्रे, आमदार एच.के. पाटील, लक्ष्मण सवदी, विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद आणि बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: