बेळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता पूर्णपणे दूर झाली असून सध्यातरी येथे कृत्रिम पावसाची कोणतीही आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


जिल्ह्यातील राकसकोप धरणासह मुख्य नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून आगामी काही दिवसांत पावसाची तूट भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात बहुतांश भागात पेरण्या पूर्ण झाल्या असून पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून विशेष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. पावसाळ्यामुळे कित्तूर आणि बैलहोंगल भागातील खराब झालेल्या रस्त्यांची सध्या तात्पुरती दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी योग्य केले जातील आणि डिसेंबर महिन्यात नवीन रस्त्यांचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली जात असली तरी गरीब व्यापाऱ्यांना त्यांचे सामान हलवण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ द्यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बाधित फेरीवाल्यांसाठी आगामी काळात नियमांनुसार पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यावर सरकार विचार करेल, असे आश्वासन सतीश जारकीहोळी यांनी दिले.
यमकनमर्डी येथील धार्मिक वादाच्या प्रकरणावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देताना, निवडणुका जवळ आल्याने किरकोळ कारणांवरून सरकारला लक्ष्य केले जात असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. अशा राजकीय आरोपांकडे लक्ष न देता कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याला सरकारचे प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.


Recent Comments