बेळगाव महानगर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर योग्य उपाययोजनांमुळे कायमस्वरूपी तोडगा निघाला असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आगामी ५ ते ७ दिवस पाऊस सुरू राहिल्यास पुढील ४ ते ५ महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीत माहिती दिली की राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून सध्या शहरात रेशनिंग पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. संपूर्ण शहराची विभागणी ३३ झोनमध्ये करण्यात आली असून नागरिकांना टप्प्याटप्प्याने पाणी दिले जात आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणीटंचाईचे सावट पूर्णपणे दूर झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्कंडेय नदीवरील जलाशयातील सद्यस्थिती पाहता पाऊस पडला नाही तरी २५ जुलैपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सहजपणे व्यवस्थापित केला जाऊ शकतो अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली. शहरात कोणत्याही भागात पाणीपुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आधीच पूर्वसूचना देणे बंधनकारक असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळी पूर्वसूचना न देता पाणी बंद केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता याची आठवण करून देत त्यांनी अधिकाऱ्यांना अशा चुका पुन्हा न करण्याच्या कडक सूचना दिल्या.
सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आधीच दोन महिन्यांचा राखीव साठा ठेवला होता असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आता पावसामुळे मुख्य धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला असून महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत जिल्ह्यातील पिकांचे नुकसान आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबतही विस्तृत चर्चा करण्यात आली असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments