Belagavi

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्री परमेश्वर यांचे निर्देश

Share

राज्यातील धरणे मृत साठ्यापर्यंत पोहोचली असून, मानवी जीव वाचवण्यासाठी उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिली.

बेळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना जी. परमेश्वर म्हणाले की, बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात पाऊस न झाल्याने भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमालीची खालावली असून यावर मात करण्यासाठी सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. तातडीच्या कामांसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. एनडीआरएफ नियमात बदलाच्या मागणीला केंद्राकडून प्रतिसाद मिळाला नसून केवळ १० टक्केच मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आकाशात ढग नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धरणे आटल्याने पिण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी पाणी न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरड्या पडणाऱ्या कूपनलिकांच्या समस्येवर मात करण्यासाठी री-बोर किंवा नवीन बोअरवेल खोदण्याचे काम हाती घेतले जात आहे. गरज भासल्यास खाजगी कूपनलिका मालकांकडून पाणी विकत घेऊन ते जनतेला पुरवण्याची योजना आखण्यात येत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Tags: