बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गावात मालमत्ता विक्रीच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, राजू सिद्धप्पा रुद्रप्पगोळ (४५) असे मृत भावाचे नाव असून, त्याचा मोठा भाऊ संजू रुद्रप्पगोळ (४९) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. घोडगेरी गावातील तीन एकर जमीन विकण्याच्या कारणावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी संजूने लहान भाऊ राजू याच्या डोक्यात दगडाने प्रहार केला आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केली.

हे दोन्ही भाऊ गोकाक तालुक्यातील अंकलगी गावातील एका पडक्या इमारतीमध्ये राहत होते आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. दररोज रात्री अंकलगी मठात जेवण करून ते त्याच पडक्या इमारतीत मुक्कामासाठी जात असत. या घटनेप्रकरणी सुरुवातीला दोन्ही कुटुंबांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.


Recent Comments