दावणगेरे येथील चिगटेरी जिल्हा रुग्णालयात आज एक भीषण सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधील ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटात कोट्यवधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली आहे.

दावणगेरे येथील चिगटेरी जिल्हा रुग्णालयात आज सकाळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर तिथे ठेवलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा प्रचंड आवाजासह स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण शस्त्रक्रियागृहात आग पसरली आणि दाट धूर कोंडला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे ऑपरेशन थिएटरमधील हायटेक उपकरणांसह कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. इतकेच नव्हे तर, थिएटरच्या आजूबाजूच्या खोल्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

रुग्णालयाला आग लागल्याचे समजताच कर्मचारी आणि रुग्णांनी जीवाच्या आकांशाने बाहेर पळ काढला. घटनेच्या वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये सात ते आठ कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डी-ग्रुपच्या (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तत्परता दाखवली आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असून, आपला पुनर्जन्मच झाल्याची भावना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments