केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज खाजगीकरण धोरणाविरोधात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

आंदोलनाला संबोधित करताना शेतकरी नेते चूनप्पा पुजाळी यांनी आरोप केला की, सुरुवातीला जिओ सिमप्रमाणे मोफत सेवा देऊन नंतर दर वाढवण्याचा छुपा डाव वीज क्षेत्रातही खेळला जात आहे. विजेसाठी ‘स्मार्ट कार्ड’ आणि जीपीएस यंत्रणा आणल्यास पैसे संपताच वीज खंडित होईल; यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना इशारा दिला की, सरकारने खाजगीकरणाची टेंडर प्रक्रिया तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा, राज्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करतील. या आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments