मान्सून पावसाला काहीसा विलंब होण्याची शक्यता असली तरी नागरिकांनी काळजी करण्याची गरज नसून आगामी जुलै अखेरपर्यंत पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात पाण्याच्या मुद्द्यावर लवकरच मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे.

कृष्णा नदीच्या पात्रातील हिप्परगी बॅरेजमध्ये तांत्रिक अडचणींमुळे गेल्या वेळी पाणी वाया गेले होते. महाराष्ट्राकडून मिळणारे दोन टीएमसी पाणी देखील सध्या बंद असल्याने हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार असून दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली जाणार असल्याचे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

जिल्ह्यातील हिडककल आणि मलप्रभा जलाशयांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा असून, त्याचा वापर केवळ पिण्याच्या कारणासाठीच टप्प्याटप्प्याने केला जात आहे. बेळगाव महानगर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पातळी खालावली असली, तरी योग्य नियोजितामुळे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हे पाणी पुरू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्तांना खाजगी विहिरी आणि टँकर्स सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामानातील बदलांमुळे यंदा पाऊस थोडा लांबणीवर पडला असला, तरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३५ ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील अनेक आठवडे पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असून, आधी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतरच शेतीसाठी पाणी देण्याबाबत विचार केला जाईल, असे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.


Recent Comments