कर्नाटक सरकारने आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत ‘जैन समाज विकास महामंडळ’ स्थापन न केल्यास विजापूर ते बेळगाव दरम्यान तीव्र आंदोलन आणि सत्याग्रह छेडण्याचा इशारा राष्ट्रसंत गुणधरनंदी महाराज यांनी दिला आहे.

चिक्कोडी तालुक्यातील कोथळी-कुप्पणवाडी गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील जैन बांधवांच्या प्रमुख बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बोलताना गुणधरनंदी महाराज यांनी सांगितले की, राज्याची संस्कृती आणि प्रगतीमध्ये जैन समाजाचे योगदान अतुलनीय आहे. भूतकाळात देवराज अर्स यांच्या कार्यकाळात जैन समाजाची हजारो एकर जमीन गरिबांना वाटण्यात आली होती. त्यामुळे या त्यागाची पार्श्वभूमी असलेले अनेक जैन बांधव आज आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. राज्यात इतर अनेक लहान-मोठ्या समाजांसाठी विकास महामंडळांची स्थापना केली जात असताना, मोठ्या संख्येने असलेल्या जैन समाजाला मात्र वंचित ठेवण्यात आले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपले भक्त असलेले डी. के. शिवकुमार हे सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असून समाजाची ही अनेक वर्षांची न्याय्य मागणी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे गुणधरनंदी महाराज यांनी म्हटले.
या बैठकीत माजी मंत्री वीरकुमार पाटील, नेते उत्तम पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. या प्रसंगी श्री १०८ आचार्य रत्न देशभूषण दिगंबर जैन शांतिगिरी ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर पाटील, सचिव पासगौडा पाटील, सुनील हनमवर, शीतल पाटील, वकील श्रीपाल मुन्नोळी, कोषाध्यक्ष पायगौडा खोत, साहू जैन, नितीन गांधी, किरण पाटील, कल्लाप्पा मगेन्नावर, तात्यासाहेब पाटील आणि अण्णागौडा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments