Belagavi

बेनकनहळ्ळीमध्ये मूलभूत सुविधांची वानवा : ग्रामस्थ आक्रमक

Share

बेळगावमधील बेनकनहळ्ळी भागात मूलभूत सुविधांचा अभाव आणि टाऊन पंचायत प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन केले.

बेनकनहळ्ळी ग्रामस्थ पंच समिती आणि नागरिकांच्या नेतृत्वाखाली बेनकनहळ्ळी टाऊन पंचायतीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भव्य निदर्शने करण्यात आली. गावातील मूलभूत समस्या सोडवण्यात पंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. नाल्यांमधील दूषित आणि सांडपाणी एका उघड्या नाल्यात सोडले जात असल्याने संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली आहे. एवढेच नव्हे तर हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये मिसळत असल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

दुसरीकडे टाऊन पंचायतीकडून करण्यात आलेल्या अवाजवी घरपट्टी वाढीला नागरिकांमधून तीव्र विरोध केला असून ही वाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. यासोबतच गावाला नियमित आणि पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा करावा तसेच केबाळी नाल्यावरील अतिक्रमण हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रमुख मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ पंच समितीने दिला आहे.

या आंदोलनात ग्रामस्थ पंच समितीचे अध्यक्ष नागेश देसूरकर, प्रमुख नेते युवराज पाटील, मोहन कांबळे, लक्ष्मण खांडेकर, रमेश देसूरकर, चंद्रकांत पाटील, सदानंद देसूरकर, महेश पाटील, सहदेव काटकर यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: