बेळगावमधील कणबर्गी परिसरातील सिद्धेश्वर नगरमध्ये जमीन वादातून एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

कणबर्गी येथील सिद्धेश्वर नगरमधील शेतकरी सिद्धप्पा लक्ष्मण मालायी यांच्या जमीन क्रमांक ५१२/३/२ बाबतचा वाद २००८ पासून न्यायालयात सुरू होता. हा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच, २०२० मध्ये १ एकर १२ गुंठे जमिनीच्या शासकीय कागदपत्रांमधून सिद्धप्पा मालायी यांचे नाव अचानक कमी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासोबतच उमेश हलगेकर यांचे नावही २० गुंठे जमिनीच्या रेकॉर्डमधून काढण्यात आले असून, याच मानसिक तणावातून सिद्धप्पा मालायी यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असतानाही जमिनीच्या शासकीय दाखल्यातून नाव वगळल्यामुळे मानसिक धक्का बसून या शेतकऱ्याने प्राण गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या घटनेप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ‘बुडा’ आयुक्तांच्याही ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संमती किंवा स्वाक्षरी नसताना बेकायदेशीर मार्गाने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बबन मालायी यांनी केली आहे.


Recent Comments