बेळगावमधील भाग्यनगर येथील ‘आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.’ कंपनीच्या प्रकरणाचा तपास वेगवान करत सीआयडी अधिकाऱ्यांचे विशेष पथक बुधवारी बेळगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी तपासाची महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

‘आदित्यराज कॅपिटल प्रा. लि.’ कंपनीविरुद्ध झालेला कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा आता अधिक गंभीर वळणावर पोहोचला आहे. दरम्यान शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याला सीआयडी अधिकाऱ्यांनी भेट दिली. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, गुंतवणूकदारांची माहिती, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि तक्रार अर्जांची पडताळणी करून सर्व कागदपत्रे सीआयडीने आपल्या ताब्यात घेतली. या वेळी सीआयडी पथकाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली.

आदित्यराज कॅपिटल कंपनीने जादा परताव्याचे आमिष दाखवून जनतेकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पैसे परत न केल्याचा गंभीर आरोप कंपनीवर आहे. आपले हक्काचे पैसे अडकल्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रारी नोंदवल्या होत्या.
टिळकवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आधारे आता सीआयडीने अधिकृत तपास सुरू केला आहे. पैशांची अफरातफर कशी झाली, कंपनीचे व्यवहार आणि संबंधित संशयितांची भूमिका काय होती, याचा सखोल तपास केला जात आहे. गरज पडल्यास कंपनीच्या संचालकांना आणि संबंधित व्यक्तींना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आपले पैसे परत मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. सीआयडीचा तपास सुरू असल्याने आगामी काळात या घोटाळ्यातील आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.


Recent Comments