बेळगाव महानगरपालिकेत ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग’ असा ठराव मांडण्याची घोषणा करत आमदार आसीफ सेठ यांनी मराठी भाषिकांचा रोष ओढवून घेतला आहे.

बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी कन्नड ठरावाबाबत केलेल्या घोषणेनंतर सीमा भागात संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या काळात मराठी भाषिकांकडून मतांचा जोगवा मागून त्यांच्याच मतांवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून मराठी भाषिकांकडे पाठ फिरवणे ही मराठी भाषिकांसाठी नवी गोष्ट नाही. मात्र ज्या मराठी भाषिकांच्या मतांच्या जोरावर आणि त्यांच्या समर्थनावर हे आमदार निवडून आले, त्याच मराठी जनतेच्या अस्मितेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्याने सीमा भागात संतापाची मोठी लाट उसळली आहे. सत्ता हाती येताच त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना आसीफ सेठ यांनी महाजन अहवालाचा दाखला देत जुनाच वाद उकरून काढला. या वेळी बोलताना त्यांनी, “माझे वडील नुरुद्दीन यांनी महाजन आयोगाच्या काळात बेळगाव कर्नाटकात राहावे यासाठी लढा दिला होता, त्यामुळे माझीही तशीच बांधिलकी आहे,” असे विधान केले. मात्र, ही बांधिलकी जपताना त्यांनी आपल्याच मराठी मतदारांच्या भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीच्या काळात मराठी भाषिकांच्या मतांची जोगवा मागून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने असा विश्वासघात करावा, याबद्दल मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
आमदारांच्या या वक्तव्यानंतर सीमा भागातील मराठी संघटना आणि नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमावाद प्रलंबित असताना, अशा प्रकारे प्रक्षोभक विधाने करून बेळगावमधील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम आसीफ सेठ करत आहेत, असा घणाघाती आरोप मराठी संघटनांनी केला आहे. मराठी जनतेच्या भावनेचा अनादर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आता सीमा भागात जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे.


Recent Comments