Belagavi

शहाजीराजे समाधीच्या दुरवस्थेमुळे केंद्र सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम

Share

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या दौलतपूर (होदेगिरी) येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. विकास न झाल्यास दिल्लीतील जंतरमंतर येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मावळा जवान संघटनेचे प्रमुख दत्ताजी नलावडे यांनी दिला.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नलावडे यांनी समाधीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ऐतिहासिक स्मारकाची देखभाल होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहाजीराजे हे केवळ मराठा किंवा हिंदुत्वाचे प्रतीक नसून त्यांनी अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
शहाजीराजे भोसले यांनी देशाच्या संरक्षणासाठी मोठी भूमिका बजावली असूनही स्मारकाकडे झालेली दुर्लक्ष दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. माजी मंत्री संतोष लाड यांना निवेदन देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. २३ जानेवारी रोजी होणाऱ्या पुण्यतिथीला हजारो भाविक येथे येतात, तरीही सोयीसुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकारने या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. समाधीस्थळाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून दर्जा देऊन त्याचे संवर्धन करावे, अशी आग्रही मागणी दत्ताजी नलावडे यांनी केली आहे. अन्यथा, १ जानेवारीपासून दिल्लीत देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Tags: