तारीहाळ येथील ऐतिहासिक बड्डेकोळ्ळ मठातील शेकडो वर्षे जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. आगामी सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी ‘प्यास फाउंडेशन’कडून ही मोहीम राबवली जात आहे.


तारीहाळमधील प्रसिद्ध ‘बड्डेकोळ्ळ मठ नागय्या स्वामी मठ’ येथे प्रत्येक अमावस्येला कर्नाटक आणि शेजारील राज्यांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मठाच्या आवारातील मोठी पारंपरिक विहीर कचरा आणि गाळ साचल्यामुळे दूषित झाली होती, ज्यामुळे येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. मठाच्या प्रशासनाने केलेल्या विनंतीला त्वरित प्रतिसाद देत ‘प्यास फाउंडेशन’ने या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे. मठाधिपती सद्रुरू नागेंद्रस्वामी यांच्या हस्ते पूजा करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

आगामी ‘अधिक मासा’तील सोमवती अमावस्येला मठात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू, सचिव प्रीती कोरे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विहिरीतील गाळ काढणे, आजूबाजूची झुडपे साफ करणे आणि संरक्षक भिंत मजबूत करण्याचे काम वेगाने केले जात आहे. या ऐतिहासिक जलस्रोताच्या संवर्धनामुळे मठाचे पवित्र्य जपले जाऊन भाविकांना पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी आधार मिळणार आहे.


Recent Comments