Belagavi

वडगाव भागात हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत

Share

एकीकडे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी गटारीत वाहून जात असल्याचा प्रकार बेळगावमध्ये समोर आला आहे.

बेळगावमधील वडगाव भागातील पाटील गल्ली परिसरात गेल्या ७ जूनपासून पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी सातत्याने गटारीत वाहून जात आहे. शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, एल अँड टी कंपनीच्या अत्यंत निष्काळजी कारभारामुळे या पाण्याची नासाडी होत आहे.

७ जूनपासून ही समस्या निर्माण झाली असली तरी अद्याप एकाही अधिकाऱ्याने याकडे फिरकूनही पाहिलेले नाही, अशी तीव्र नाराजी स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने आतातरी या गंभीर समस्येची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: