बेळगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कणबर्गीमधील रामतीर्थ गल्लीतील रहिवाशांचे मोठे हाल झाले आहेत. योग्य रस्ते आणि गटारींची सोय नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले असून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

बेळगावमधील कणबर्गी इंडल रस्त्यावरील रामतीर्थ गल्लीमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचले आहे. या भागात गटारी आणि रस्त्यांची कोणतीही पद्धतशीर व्यवस्था नसल्याने पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही. हे पाणी स्थानिक रहिवासी कल्लाप्पा हगनायक यांच्या घरासह परिसरातील इतर नागरिकांच्या घरांमध्ये आणि अंगणात शिरले. यामुळे घरातील अन्नधान्य तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले असून पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.

मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दरवर्षी पावसाळ्यात या भागात अशीच गंभीर परिस्थिती निर्माण होते. मात्र, महापालिकेचे अधिकारी या समस्येकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आतातरी या समस्येची दखल घेऊन तातडीने रस्ते आणि गटारींची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments