Belagavi

१२० जागा जिंकल्यास मुख्यमंत्रीपदाचा विचार; सतीश जारकीहोळींचे स्पष्टीकरण

Share

केपीसीसी अध्यक्षपद न मिळाल्याने पक्षात कोणतीही नाराजी नाही. आगामी २०२८ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १२० हून अधिक जागांवर विजय मिळवून देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असून त्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा विचार केला जाईल, असे मत राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

बेळगावमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केपीसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असतानाही पद न मिळाल्याबाबत बोलताना, पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळेच हा निर्णय झाला असून यात कोणाचाही अडथळा नव्हता, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. स्वतःविरुद्ध सुरू असलेल्या अपप्रचाराची पोलीस चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी २०२८ मध्ये आधी काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे आणि किमान १२० जागा जिंकणे हे पहिले ध्येय असून त्यानंतरच पुढील मुख्यमंत्रीपदाची गणिते ठरतील, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

अहिंदा नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या चर्चेवर बोलताना, नेत्यांनी या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे, असे सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले. सध्या मंत्री म्हणून काम करण्याची पूर्ण संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना, २०१६ मध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले जी. परमेश्वर यांनी संयम ठेवल्याने त्यांना आता उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्याचप्रमाणे आपणही वाट पाहिल्यास नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. तसेच अहिंदा ही एक वेगळी संघटना असून राजकीय फायद्यासाठी ती अधिक बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांचे नेतृत्व बदलल्यास काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत, या भाजप नेत्यांच्या आणि आमदार लखन जारकीहोळी यांच्या विधानावर त्यांनी कोणाच्या रागातून असे विधान केले आहे, हे त्यांनाच विचारले पाहिजे, असा टोला सतीश जारकीहोळी यांनी लगावला.

बेळगावमधील विकासकामांचा आढावा घेताना, शहरातील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी या महिन्याअखेर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली. तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खाजगी भाजी मार्केटचा वाद मिटवण्याची जिम्मेदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Tags: