माजी राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांचा कार्यकाळ २५ जून रोजी संपत असून, त्यांच्या जागी धारवाडचे एम. नागराज यांची नवीन राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय विधान परिषदेसाठी लिंगराज पाटील आणि रघू कौटिल्य यांची निवड झाल्याची माहिती ईरण्णा कडाडी यांनी दिली.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ईरण्णा कडाडी बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीने धारवाडमधील सर्वसामान्य कार्यकर्ते एम. नागराज यांची राज्यसभेसाठी निवड केली असून या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे सांगत त्यांनी नवनवीन उमेदवारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पक्षाने नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

स्वतः सामान्य कार्यकर्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला ६ वर्षे राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली, याबद्दल कडाडी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कार्यकाळात २३ कोटी ५३ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीतून विविध योजना राबवल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव देणे आणि त्यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
गडीविवादाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना, बेळगाव हा कर्नाटकचाच अविभाज्य भाग आहे हे त्रिकालाबाधित सत्य असून त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही, असे कडाडी म्हणाले. बेळगाव महापालिकेतील तांत्रिक अडचणींबाबत आपल्याला माहिती नसून, तो विषय महापौर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि आमदारांशी संबंधित आहे, असे सांगत यावर योग्य चर्चा केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक राजशेखर ढोणी, ईरय्या खोत, बारकर, महादेव राठोड, सिद्धनगौडा यांच्यासह इतर लोक उपस्थित होते.


Recent Comments