कर्नाटकातील वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध करत चिक्कोडीमध्ये हेस्कॉम आणि केपीटीसीएल कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी भव्य निदर्शने करण्यात आली.

मुंबईच्या ‘द टाटा पॉवर कंपनी लिमिटेड’ने हेस्कॉमसह राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये वीज वितरणाचा परवाना मिळवण्यासाठी ‘कर्नाटक वीज नियामक आयोग’ (KERC) कडे अर्ज केला आहे. या प्रस्तावाचा निषेध करत चिक्कोडी येथील हेस्कॉम विभागीय कार्यालयासमोर वीज कर्मचारी, अधिकारी आणि युनियनच्या सदस्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनादरम्यान बोलताना केपीटीसीएल कर्मचारी युनियनचे सचिव एस. बी. कुलकर्णी यांनी सरकारवर निशाना साधला. वीज क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हातात गेल्यास शेतकऱ्यांना मिळणारी मोफत वीज आणि ‘गंगा कल्याण’सारख्या लोककल्याणकारी योजना बंद पडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या केवळ नफा कमावण्याच्या धोरणामुळे शेतकरी आणि सामान्य ग्राहक आर्थिक संकटात सापडतील. त्यामुळे सरकारने तातडीने यावर पाऊल उचलले नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन आणि कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.
यावेळी हेस्कॉमचे अधिकारी सुप्रभा बंडगर, संजय सुखसारे आणि एस. बी. तहसीलदार यांनीही आपले मत मांडले. आपल्या राज्यातील वीज क्षेत्राकडे उत्तम पायाभूत सुविधा आणि तांत्रिक क्षमता असताना, परराज्यातील नफाखोर कंपनीला इथले वीज क्षेत्र सोपवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केइआरसी ने टाटा पॉवर का अर्ज त्वरित फेटाळावा, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात हेस्कॉमचे अधिकारी सचिन मगदूम, एन. टी. पाटील, डी. ए. मुल्ला यांच्यासह विभागीय कार्यालयातील शेकडो कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments