चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी येथे सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध राज्यांतील नामवंत मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

या स्पर्धेत कर्नाटकासह महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील मल्लांनी आपले कुस्तीचे डावपेच सादर केले. आखाड्यातील चुरशीच्या लढतींनी उपस्थित हजारो कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. विजेत्या मल्लांना लाखो रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.


आमदार दुर्योधन ऐहोळे आणि माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्पर्धेला उपस्थित राहून मल्लांशी हस्तांदोलन करत त्यांना प्रोत्साहन दिले. कुस्तीसारख्या पारंपरिक खेळाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थ करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

स्पर्धेचे आयोजक सिद्धाप्पा मयराई, विरुपाक्षी ईटी आणि शिवपुत्र मनगोळी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेनिमित्त विविध राज्यांतील मल्लांना आमंत्रित करून कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. परिसरातील गावांमधील हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण, यात्रा कमिटीचे सदस्य आणि परिसरातील गावांमधील हजारो कुस्तीप्रेमी या स्पर्धेचे साक्षीदार ठरले.


Recent Comments