सीमाभागातील आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज गंभीर वातावरणात हुतात्मा दिन पाळण्यात आला. यावेळी बेळगावमधील विविध मराठी संघटनांचे नेते आणि नागरिक उपस्थित होते.


बेळगावमधील हिंडलगा जवळील हुतात्मा स्मारकाला अनेक मराठी भाषिकांनी भेट दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. २२ जूनपर्यंत बेळगावमधील शासकीय कार्यालये आणि खाजगी संस्थांवर ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांचा नियम लागू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकाश मरगाळे यांनी दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा खटला प्रलंबित असेपर्यंत कन्नडसोबतच मराठीतही कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रकाश मरगाळे यांनी केली.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमावादासाठी प्राणांची आहुती देणाऱ्याщих त्यागाचे स्मरण केले. सरकारने ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषा वापरण्यास परवानगी दिली असली, तरी बेळगाव प्रशासनाकडून याचे उल्लंघन करून १०० टक्के कन्नड सक्तीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनोहर किणेकर यांनी केला. याच्या निषेधार्थ २२ जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये मराठी भाषिकांनी बेळगावमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले.
दिगंबर पाटील यांनी हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता, सर्वांनी एकत्र यूम आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढा देण्याचे आवाहन केले.
शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून, सर्वांनी संघटित होऊन हुतात्म्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन केले. मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव सोबत राहील, अशी ग्वाही प्रकाश शिरोळकर यांनी दिली.
या प्रसंगी आर. एम. चौगुले, राजाभाऊ पाटील, गोपाळ देसाई, माजी महापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments