बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील तेन तलाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत दीड किलोमीटर लांबीच्या कालव्याची श्रमदानातून स्वच्छता केली. ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबवण्यात आलेल्या या जलसंधारण उपक्रमाला मोठे यश आले आहे.

बसरिकट्टी, शिंदोळी आणि मुतगा या तीन गावांच्या शेतजमिनीतून जाणाऱ्या दीड किलोमीटर कालव्याच्या पुनरुज्जीवनासाठी मुतगा येथील ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदान केले. या कालव्यामधूनच गावातील मुख्य तलावाला पाणीपुरवठा होतो, मात्र गाळ साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत विकास अधिकारी बसवंत कडेमणी, स्थानिक शेतकरी, नागरिक आणि ‘आपले सेवाभावी’ ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत कालवा स्वच्छतेची मोहीम हाती घेतली.

या मोहिमेदरम्यान मुतगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष उमेश पुरी यांनी या जलमार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. बसरिकट्टी ते मुतगा दरम्यानचा हा कालवा सध्या मातीचा असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते, त्यामुळे शासनाने या कालव्याचे तातडीने काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी विकास करावा, अशी मागणी उमेश पुरी यांनी केली.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तलावाच्या परिसरातच एक स्वतंत्र आणि सुसज्ज विसर्जन कुंड भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उमेश पुरी यांनी दिली.


Recent Comments