राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिमंडळ विस्तारातील राजकीय समीकरणांवर महत्त्वाची विधाने केली आहेत.

पत्रकार परिषदेत राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय लवकरच निश्चित होईल. केपीसीसी अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे दोन ते तीन नावांची शिफारस हाय कमांडकडे करण्यात आली असून, योग्य नेत्याची निवड केंद्रीय नेतृत्व करेल. प्रदेशाध्यक्षपदासोबतच उपमुख्यमंत्रिपदही देण्यात यावे, या समर्थकांच्या मागणीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पक्ष संघटना आणि हाय कमांडचा निर्णय यावरच अंतिम मोहोर उमटवेल.

मंत्रिमंडळातील बदलांबाबत बोलताना त्यांनी पक्षात नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. पक्षात सध्या कोणताही अंतर्गत वाद नसून समन्वय समितीबाबत सिद्धरामय्या यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे ठेवलेल्या मागणीवर पक्ष पातळीवरच निर्णय घेतला जाईल. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच असणे स्वाभाविक आहे, मात्र मंत्रिमंडळाची मर्यादा ३४ जागांचीच असल्याने त्यापेक्षा जास्त संख्या वाढवणे शक्य नाही. मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पुढील राजकीय गणिते स्पष्ट होतील आणि हाय कमांडच्या निर्णयाला सर्व नेते बांधील राहतील, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments