State

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदावरून राजीनाम्याची घोषणा

Share

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली आहे. मला कोणतेही दुःख नसून, मी अत्यंत मनापासून हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


मुख्यमंत्रिपदाच्या बदलाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. ‘कावेरी’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांनी आपण मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले. दिल्लीत झालेल्या हायकमांडच्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी सत्ता हस्तांतरास संमती दिली होती. राहुल गांधी यांच्याकडून थेट संदेश आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

या बैठकीत सत्ता हस्तांतराची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि पक्षात एकसंधतेचा संदेश देण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री जी. परमेश्वर, मंत्री एम. सी. सुधाकर, बायराथी सुरेश, संतोष लाड आणि रामलिंगा रेड्डी यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

पुढील मुख्यमंत्री कोण असेल याचे नाव जाहीर न करता, हायकमांड याबाबतचा अंतिम निर्णय घेईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करेल, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा करताच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सिद्धरामय्या यांनी दिलेल्या शब्दाचे पालन केल्यामुळे शिवकुमार भावूक झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

Tags: