State

केपीसीसी अध्यक्षपदाची चर्चा खऱ्या अर्थाने सुरू; सतीश जारकिहोळींचे मोठे वक्तव्य

Share

राज्याच्या राजकारणात तीव्र उत्सुकता निर्माण करणाऱ्या केपीसीसी अध्यक्षपद आणि मुख्यमंत्री बदलाच्या प्रक्रियेवर मंत्री सतीश जारकिहोळी यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेच केपीसीसीच्या नेतृत्वाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केपीसीसी अध्यक्षपदाचा बदल किंवा ते पद कायम ठेवण्याबाबत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दिल्लीला जाऊन हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. दिल्ली दौऱ्यानंतर राज्यातील हे दोन्ही बडे नेते एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, असे सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. केपीसीसीचे नेतृत्व कोणाकडे सोपवायचे, याची संपूर्ण जबाबदारी या दोन्ही नेत्यांवरच सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्या यांच्याविरोधात आमदार स्वाक्षरी मोहीम राबवत असल्याच्या प्रश्नावर ही केवळ अफवा आणि खोटी बातमी असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. हायकमांडच्या पातळीवर झालेल्या करारानुसारच सर्व प्रक्रिया शांततेत पार पडत आहेत. दिल्लीत हायकमांडच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची कोणालाही पूर्वकल्पना नव्हती. हायकमांडच्या सूचनेवरूनच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय कोणाला विचारून घेतलेला नाही, तर पक्षाच्या अंतर्गत कराराचा एक भाग म्हणून या गोष्टी घडल्या आहेत. लवकरच डी. के. शिवकुमार हे सत्ता हाती घेण्यासाठी येत असून, राजकारणात असे बदल सहज मानले जातात, असे सतीश जारकिहोळी यांनी म्हटले.

राज्यात अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही सतीश जारकिहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. लवकरच बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीनंतर उपमुख्यमंत्रीपदांबाबत अंतिम निर्णय होईल. राज्यात किती उपमुख्यमंत्री होणार, हे या बैठकितूनच स्पष्ट होईल. अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदे निर्माण होऊही शकतात किंवा नाही, असे सतीश जारकिहोळी यांनी सांगितले.

Tags: