hubbali

हुबळी: गटारीत मलमिश्रित सांडपाणी सोडल्याने नूल्वीमध्ये संताप

Share

हुबळी जवळील नूल्वी गावात सेप्टिक टँक साफ करून त्यातील मलमिश्रित सांडपाणी थेट गावच्या गटारीत सोडणारे एक खाजगी वाहन नागरिकांनी रंगेहात पकडले आहे. या प्रकारामुळे हुबळी तालुक्यातील नूल्वी ग्रामपंचायत परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या सर्वत्र आजारपण पसरण्याची भीती असताना, ‘पी. आर. के.’ नावाचे खाजगी सेप्टिक टँक क्लीनिंग वाहन (क्रमांक: KA-20 AB-1160) खाजगी घरांमधील सेप्टिक टॅंक स्वच्छ करून नूल्वी गावातील मुख्य रस्त्याशेजारील गटारीत बेकायदेशीरपणे सोडत होते. हा प्रकार सुरू असतानाच स्थानिक लोकांनी चालकाला आणि कर्मचाऱ्यांना जागीच पकडले.

नियमांनुसार, सेप्टिक टँकमधील घाण हि लोकवस्ती नसलेल्या आणि ठरवून दिलेल्या विशिष्ट जागेतच टाकणे बंधनकारक आहे. मात्र, हे चालक दररोज नागरिकांची ये-जा असलेल्या मुख्य रस्त्यावरील आणि घरासमोरील गटारात हे दूषित पाणी सोडत होते. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची माहिती नूल्वी ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली, मात्र त्यांनी यावर कोणतीही तात्काळ कारवाई केली नाही. त्यामुळे लोकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ग्रामीण पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी या वाहनावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: