मुख्यमंत्री पदाचा सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सिद्धरामय्या यांना पदावरून हटवून हायकमांडने मोठ्या वादाला तोंड दिले असून आगामी काळात राज्यातील काँग्रेस सरकार कोसळेल, असा दावा पक्षाचेच विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी केला आहे.

सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आमदार लखन जारकीहोळी यांनी काँग्रेस हायकमांडवर तीव्र शब्दांत निशाना साधला. सिद्धरामय्या यांच्या जाण्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार पतनाच्या मार्गावर जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सिद्धरामय्या यांनी आर्थिक परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली होती, मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण होईल. ज्येष्ठ नेत्याला पदावरून हटवून हायकमांडने कुरुबा समाज आणि संपूर्ण अहिंदा समुदायाचा विश्वासघात केला आहे, अशी प्रतिक्रिया लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केली.

यापूर्वी वीरेंद्र पाटील यांना हटवून लिंगायत समाजावर अन्याय करणाऱ्या काँग्रेसने आता अहिंदा नेत्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा थेट आरोप लखन जारकीहोळी यांनी केला. हायकमांडचे नेते रणदीपसिंग सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनी कर्नाटकचे राजकारण खराब केले आहे. अहिंदा समाजाशी झालेल्या या फसवणुकीचा परिणाम २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत दिसेल आणि काँग्रेसला ४० जागा जिंकणेही कठीण होईल, अशा शब्दांत लखन जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments