ARREST

बेळगावात आयपीएल क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Share

बेळगावात आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाईन क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्याचा मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवणाऱ्या या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

बेळगावमधील जुन्या भाजी मार्केट जवळील सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून आयपीएल क्रिकेट बेटिंग खेळवणारा आरोपी विशाल आदिनाथ गोरगोंडा याला मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय शशिकुमार कुरळे आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला आरोपी हा सध्या फरार असलेला दुसरा आरोपी उत्तम रवी जाधव याच्या सांगण्यावरून मोबाईलद्वारे लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ४,००० रुपये किमतीचा मोबाईल आणि १,५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग्य वेळी छापा टाकून ही बेकायदेशीर कारवाई उघडकीस आणणाऱ्या पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.

Tags: