बेळगाव शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्यावर मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वी छापा टाकला आहे. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग खेळवणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

बेळगावमधील खडेबाजार पोलीस चौकीजवळ उज्ज्वल नगरमधील मैताब अब्दुलसाब मुल्ला हा नागरिकांकडून पैसे घेऊन मोबाईलद्वारे आयपीएल क्रिकेटवर बेटिंग खेळवत असताना मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय हुसेनसाब केरूर आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून ४,००० रुपये किमतीचा मोबाईल आणि १,९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून चौकशीत रोहित नावाच्या आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, न्यू सिटी बसस्थानकाजवळ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यावर ‘क्रिकेट बेट-९९’ ॲपद्वारे बेटिंग सुरू असताना मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला आणि सध्या रामदेव गल्ली येथे राहणारा अफताला असगरअली याला पीएसआय शशिकुमार एस. कुरली आणि कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून ५,००० रुपये किमतीचा मोबाईल आणि ४,७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई करणाऱ्या पथकाचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


Recent Comments