Belagavi

बेळगावमधील रामतीर्थ नगरमध्ये अडीच कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Share

बेळगावमधील रामतीर्थ नगरमधील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या पायाभूत सुविधांच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. स्थानिक आमदार आसिफ सेठ यांनी आज या भागातील प्रमुख विकासकामांचा अधिकृत शुभारंभ केला. अडीच कोटी रुपयांच्या या विकासकामांमुळे रामतीर्थ नगरचा कायापालट होणार आहे.


रामतीर्थ नगरमधील नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली रस्ते आणि सुसज्ज गटार व्यवस्थेची मागणी लक्षात घेऊन आमदार आसिफ सेठ यांनी या कामांचे भूमिपूजन केले. एकूण २.५ कोटी रुपयांच्या या विकास योजनेमुळे या भागातील वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या जलमय परिस्थितीपासून येथील रहिवाशांना या कायमस्वरूपी कामांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या परिसरामध्ये सातत्याने सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करत स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार आसिफ सेठ यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या भागात आतापर्यंत सुमारे २५ कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झाल्याची माहिती आमदार आसिफ सेठ यांनी दिली. तसेच दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी दिले. या कार्यक्रमाला तरुण नेते अमन सेठ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: