देशभरात आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या आणि गोवंश वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिले. कर्नाटकातील गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


बकरीद सणाच्या काळात कुर्बानीच्या नावाखाली होणारी गोहत्या रोखण्यात यावी, यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी आपली भूमिका मांडली. कर्नाटकात बकरीदच्या निमित्ताने होणारी गोहत्या पूर्णपणे रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत, असे मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात सरकारी आदेश असूनही अवैध वाहतूक आणि गोहत्या सुरू असून त्याला तातडीने आळा घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच हिंदू परंपरेत गाईला पूजनीय मानले जात असल्याने गोहत्येमुळे भावना दुखावतात; त्यामुळे २९ मे पर्यंत जनावरांचे बाजार बंद ठेवावेत आणि मुख्य रस्त्यांवर पोलीस चेकपोस्ट उभारून तपासणी पथके नेमावीत, अशी मागणी मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केली.
आंदोलनातील दुसरे वक्ते कृष्णा भट यांनीही या विषयावर तीव्र मत व्यक्त केले. भारत हा कृषीप्रधान देश असून दिवसेंदिवस गोधनाची संख्या कमी होत चालली आहे, अशी चिंता कृष्णा भट यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गोवंशाच्या रक्षणासाठी काम होत असल्याचे सांगत, उत्तर प्रदेशातील मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी आणि मौलाना रिझवी यांनीही गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याचे समर्थन केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे केवळ हिंदूंच्या समाधानासाठी विधाने न करता देशात गोहत्या पूर्णपणे थांबवून गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कृष्णा भट यांनी केली.
या आंदोलना दरम्यान विजय जाधव, ए. एन. करलिंगण्णावर, डॉ. सुभाष पाटील, श्रीदेवी बुडवी, आनंद करलिंगण्णावर, भावकण्णा लोहार, सुनील, किरण किल्लेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments