मातृभाषा ही केवळ शब्दांची जुळणी नसते तर ती माणसांची सांस्कृतिक ओळख असते, भाषिक अस्मिता असते. इथल्या माणसाच्या काळजावर मराठी भाषा मोठ्या भक्तीभावाने कोरली आहे आणि ती मराठी माणसाने निष्ठेने जपली आहे असे नमूद करून सध्याची परिस्थिती पाहता साहित्यिकांनी निर्भय सत्यशोधक झाले पाहिजे, असे प्रतिपादन साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे यांनी केले.


अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा शाखा आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आज रविवारी खानापूर रोडवरील छ. शिवाजी महाराज संमेलन नगरी (मराठा मंदिर) येथे मराठीच्या गजरात उत्स्फूर्त वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून प्राचार्य डॉ. पाटणे बोलत होते. माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात. मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो डॉक्टर, इंजिनिअर, कलेक्टर होण्यासाठी कोणतीही भाषा चालू शकते. तथापि उद्याचे लेखक कवी आणि कलावंत निर्माण होण्यासाठी मातृभाषेचे आणि मराठी संस्कृतीचे संस्कार प्रेरक ठरतात. प्रत्येक देशातील आणि प्रदेशातील साहित्याची भाषा वेगवेगळी असली तरी सर्व साहित्याचा केंद्रबिंदू माणूस असतो. सध्या धार्मिक आणि भाषिक द्वेषभावनेमुळे समाज जीवन दुभंगले जात आहे. संस्कृतीचे हानी होत आहे. अतिरेकी चंगळवादामुळे तरुणाई दिशाही होत चालली आहे आणि मूल्यहीन राजकारणामुळे संविधानाला तडे जात आहेत. यातून तरुणाईचा, शेतकरी, कामगारांचा आक्रोश वाढत चालला आहे.


मराठा मंदिर येथील 7 व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात आज सकाळी 9 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी उद्घाटनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी आणि लोकनेते कै. अजितदादा पवार सभागृह कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन व पॉलिहाइड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, धर्मवीर छ. संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज, संत तुकाराम वगैरे विविध प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम शिवाजी अतिवाडकर परशराम जोगानी -घाडी, युवराज हुलजी, दत्तप्रसाद गिझरे, वाय. बी. चव्हाण, आर. एम. चौगुले, महादेव चौगुले, महेश किल्लेकर, शिवाजी मंडोळकर, संजू गावडा, शिवाजी शिंदे, बाळासाहेब काकतकर आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून उद्योजक व मराठा मंदिर बेळगावचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव उपस्थित होते. स्वागताध्यक्ष संजय गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत, तर एल. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अप्पासाहेब गुरव यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, रणजीत चौगुले, संजय गुरव, एम. वाय. घाडी आदी हजर होते.

संमेलनाचे उद्घाटन आणि पहिल्या सत्रातील अध्यक्षीय भाषणानंतर दुसऱ्या सत्रात ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर शिवव्याख्याते पुण्याचे यशवंत गोसावी यांचे जोषपूर्ण व्याख्यान झाले.

स्नेहभोजनानंतर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे यांचा ‘काळजातल्या कविता’ ही काव्य मैफल पार पडली. संमेलनाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील व स्मिता किल्लेकर यांनी केले. संमेलनास बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणचे साहित्यिक कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments