इंधन दरवाढ, पंतप्रधानांचे परदेश दौरे आणि राज्यातील संभाव्य मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बागलकोटमध्ये महत्त्वाची विधाने केली आहेत. केंद्र सरकारचे अपयश आणि भाजप नेत्यांच्या सायकल आंदोलनावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली.

बागलकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी देशातील सततच्या इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने दरवाढ न थांबवल्यास राज्य सरकारची तिजोरी रिकामी होईल, त्यामुळे केंद्र सरकारनेच यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करताना देशाच्या विकासाऐवजी इतर बाबींचीच चर्चा जास्त होत असल्याचे ते म्हणाले.

देशभरात सध्या चर्चेत असलेल्या ‘कोक्रोच जनता’ मोहिमेबाबत बोलताना त्यांनी वाढत्या लोकक्षोभाकडे लक्ष वेधले. या मोहिमेला घाबरून भाजपने त्यात अडथळे आणल्याचा आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेचे समर्थन केल्याचे सांगत त्यांनी भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. तसेच भाजप नेत्यांचे सायकल आंदोलन हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी हा निर्णय बेंगळुरू आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चेचा इन्कार करत, त्यांनी पक्षाच्या अंतिम निर्णयाशी बांधील असल्याचे सांगितले. प्रशासकीय पातळीवर कोणताही गोंधळ नसून सर्व विकासकामे सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments