Belagavi

बेळगावमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी

Share

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यामध्ये जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, अवैध कत्तल आणि अनधिकृत कसाईखान्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी श्रीराम सेना संघटनेने केली आहे. या संदर्भात गुरुवारी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले.


श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवीकुमार कोकीतकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. सणाच्या काळात जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

संविधानातील तरतुदींनुसार जनावरांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रविकुमार कोकीतकर यांनी केली आहे.

सणादरम्यान सोशल मीडियावरून धार्मिक भावना दुखावणारे संदेश किंवा प्रक्षोभक पोस्ट पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. तसेच नागरिकांना तक्रार नोंदवता यावी यासाठी तालुका पातळीवर विशेष नियंत्रण कक्ष आणि मदतवाहिनी सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.

या प्रसंगी श्रीराम सेनेचे उत्तर कर्नाटक उपाध्यक्ष विनयकुमार अंग्रोळी यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: