केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बेळगाव महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांचा अभिप्राय गोळा करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’ सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केंद्र सरकारने २०१६ पासून स्वच्छ भारत मिशन सुरू केले असून, नागरिकांच्या अभिप्रायानुसार शहरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकांना स्टार रँकिंग आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा बेळगाव महानगरपालिकेने या अभियानात सहभाग घेतला असून, मनपा आयुक्त कार्तिक एम. यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबवली जात आहे.

शहरातील एकूण लोकसंख्येच्या किमान ५ टक्के नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवल्यास बेळगाव महानगरपालिका आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकेल. या सर्वेक्षणात कचरा व्यवस्थापन आणि शौचालय स्वच्छता यासारख्या एकूण पाच प्रश्नांचा समावेश आहे. नागरिक ॲपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.
महानगरपालिकेचे प्रतिनिधी विविध संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन नागरिकांची मते जाणून घेत आहेत. बेळगावमधील नागरिकांनी या प्रतिनिधींना सहकार्य करावे किंवा स्वतः ॲपद्वारे आपले मत नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांनी केले आहे.


Recent Comments