hubbali

‘किम्स’ रुग्णालयाला महिला आयोगाच्या अध्यक्षांची भेट

Share

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी हुबळीमधील ‘किम्स’ (KIMS) रुग्णालयाला भेट देऊन तेथील महिला व बाल आरोग्य सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

या भेटीदरम्यान त्यांनी संवदत्ती येथील एका ११ वर्षांच्या आजारी मुलाच्या उपचारासाठी विशेष मदत जाहीर केली. या मुलावर ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ उपचार करणे आवश्यक असल्याने त्याला किम्स रुग्णालयातून इंदिरा गांधी रुग्णालय आणि त्यानंतर जैन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या उपचाराचा खर्च आरोग्य योजनेअंतर्गत केला जाणार असला, तरी तांत्रिक कारणांमुळे आवश्यक असणारी २ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करून दिली जाईल, अशी प्रतिक्रिया नागलक्ष्मी चौधरी यांनी दिली.

यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी किम्स रुग्णालयातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. हुबळीमधील किम्स रुग्णालयाबाबत थेट तक्रारी नसून, इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांमुळे येथे कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खाटांची टंचाई भासत असून काही रुग्णांना जमिनीवर तर काही खाटांवर एकाच वेळी दोघांना झोपावे लागत आहे. या सर्व समस्या आणि कर्मचाऱ्यांची कमतरता याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे नागलक्ष्मी चौधरी यांनी म्हटले.

यासोबतच, बाळंतपणाच्या वेळी होणारे माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही नागलक्ष्मी चौधरी यांनी दिले.

Tags: