ARREST

संकेश्वर पोलिसांकडून मोटरसायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

Share

संकेश्वर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांचा छडा लावत सहा चोरांना अटक केली आहे. संशयितांकडून १४ मोटरसायकल आणि ‘सीईआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

संकेश्वर शहरातील रहिवासी गिरीश तुकाराम सत्यनाईक यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार संकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाक उपविभागाचे डीएसपी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वरचे पोलीस निरीक्षक गणपती कोंगनळ्ळी आणि उपनिरीक्षक विठ्ठल नाईक यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. या पथकाने अमित बसवराज कोळी आणि आनंद यल्लप्पा घस्ती (दोन्ही रा. मुतनाळ, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी संकेश्वर, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव शहर आणि महाराष्ट्रातील गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. संशयितांकडून ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या कारवाईत निडसोसी येथील बाबूगौडा चंद्रगौडा पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास पथक तयार केले होते. या पथकाने सुमित गंगाराम कांभार (रा. निडसोसी), शिवराज निंगौडा पाटील (रा. कमतनूर), ओंकार मोहन कडलगीकर (रा. कडलगे, गडहिंग्लज, महाराष्ट्र) आणि किरण हणमंत कांभार (रा. निडसोसी) यांना अटक केली. या संशयितांनी निडसोसी, गोकाक आणि अंकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ४ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही कारवाईत ६ लाख १० हजार रुपयांच्या एकूण १४ दुचाकी जप्त केल्या असून, ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने १४ मोबाईलही शोधून काढले आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संकेश्वर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: